माजलगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांंच्या गटाला हाबाडा बसला. गंगामसला, दिंद्रुडमध्ये भाजप, नित्रूडमध्ये कम्युनिस्ट तर मोगरा येथे संमिश्र पॅनल आल्याचा दावा करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेत राष्ट्रवादीने वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २२ पैकी ९ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीने बाजी मारली, तर भाजपकडे ५, शिवसेनेकडे ४, भाजप, शिवसेना युती १, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीकडे २ ग्रामपंचायती आल्या. भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवार व शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना फारसे यश प्राप्त करता आले नाही. धारूर तालुक्यातील चार पैकी दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एक तर एका ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र उमेदवार निवडून आले. वडवणी तालुक्यात देवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला. सोन्ना खोटा, देवळा ग्रामपंचायत आ. प्रकाश सोळंके यांच्या गटाच्या ताब्यात आल्या. अंबाजोगाई तालुक्यातील सातपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तीनपैकी दोन राष्ट्रवादीच्या तर एक भाजपाच्या ताब्यात आली. परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण बारापैकी १० ग्रामपंचायती आपल्या पॅनलकडे आल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा मतदारांवर परिणाम जाणवला नाही. मतदारांनी धनंजय मुंडेंवर विश्वास टाकत १२ पैकी दहामध्ये विजय मिळवून दिला. आष्टी, पाटोदा तालुक्यांतही आ. सुरेश धस समर्थकांचे वर्चस्व दिसून आले. बीड तालुक्यातील २९ पैकी २१ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे. केज तालुक्यात २३ पैकी १२ जागा जिंकल्याचा दावा भाजपने तर १४ जागांवर राष्ट्रवादीने दावा केला.
बीड जिल्ह्यात प्रस्थापितांना हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:35 AM