लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्त्री जातीचे नवजात बाळ टाकून देण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नको असलेले बाळ असे टाकून देऊ नका. त्यासाठी आम्हाला फोन करा. ते बाळ आमच्या स्वाधीन करा. ‘त्या’ बाळाचे आम्ही पुनर्वसन करू. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार आहे. त्याला फेकून देऊन त्याच्या जिवाला धोका पोहोचू नका, असे आवाहन शांतीवन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी केले.
जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या इच्छा, अपेक्षा, प्रतिष्ठा राखण्यासाठी एखाद्या कोवळ्या जिवाच्या जिवावर उठून त्याचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सरकार आणि संस्था प्रयत्नशील आहेत. या बाळांचे जीव वाचविण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. पण, नको असलेली बाळं टाकून देण्याच्या घटना बीड जिल्ह्यात अजून थांबत नाहीत. ज्यांना बाळं नको असेल अशा माता, पिता, कुमारी मातांनी या लेकरांना फेकून देऊन ‘त्या’ कोवळ्या जिवाला इजा पोहोचेल असे कृत्य करू नये. त्यासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथे शांतीवनचे ‘सुलभा सुरेश जोशी शिशुगृह’ या नावाने या मुलांचे पालन पोषण, संगोपन करणारे केंद्र आहे. या केंद्रास केंद्र सरकारच्या महिला बालकल्याण विभागाची मान्यता आहे. या संस्थेमार्फत नको असलेल्या मुलांचा स्वीकार करून त्यांचे संगोपन करून त्यांना चांगल्या सक्षम कुटुंबात पुनर्वसित केले जाते. माता-पित्यांची ओळख गोपनीय ठेवली जाते. इतक्या सुविधा सरकार आणि संस्थेने निर्माण केलेल्या असतानाही बाळ टाकून देण्याच्या घटना घडणे हे अशोभनीय आणि मानवतेला न शोभणारे आहे, असेही नागरगोजे यांनी सांगितले.
....
बाळांना वाचविणे सर्वांचे कर्तव्य
बाळ नको असणाऱ्या जन्मदात्यांनी, तसेच असे बेवारस बाळ निदर्शनास येतील अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, नर्स, डॉक्टर, कुमारी मातांनी ‘शांतीवन’ संस्थेशी संपर्क साधावा किंवा जिल्हा बालकल्याण समिती, जवळच्या पोलीस ठाण्याला याची त्वरित माहिती द्यावी. या बाळांना वाचविणे सर्वांचे कर्तव्य आहे. लक्षात ठेवा जन्मदात्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते, असेही संस्थेचे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.
090721\1721-img-20210709-wa0040.jpg
फोटो