- सतीश जोशी
बीड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता.
दौंड पिता-पुत्रांनी दिवस-रात्र प्रचार करुन धनंजय यांच्या विजयास मोलाचा हातभार लावत जबाबदारी यशस्वी पेलली आणि पवारांनीही विधान परिषदेची उमेदवारी देत शब्द पाळल्याने बीड जिल्ह्यास आता संजय दौंड यांच्या रुपाने आणखी एक आमदार मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसे बघितले तर उमेदवार संजय दौंड हे काँग्रेसचे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दौंड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. गोपीनाथराव मुंडे आणि दौंड कुटुंबातील ३० ते ३५ वर्षांपासूनचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. १९८५ साली पंडितराव दौंड यांनी गोपीनाथरावांचा तत्कालीन रेणापूर (आताचा परळी) विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. नंतर मात्र ९० आणि ९९ साली ते पराभूत झाल्यानंतर राजकारणाची धुरा संजय दौंड यांनी स्वत:च्या खांद्यावर घेत मुंडे यांच्याशी राजकीय संघर्ष चालूच ठेवला परंतु, दाळ शिजत नव्हती.
गोपीनाथरावानंतर पंकजा आणि डॉ. प्रीतम मुंडे यांच्याशी परळीतील प्रत्येक निवडणुकीत विरोध करणे त्यांनी सुरूच ठेवले होते. धनंजय मुंडे हे काका गोपीनाथरावांसोबत असताना त्यांनाही जि.प., अंबाजोगाई, परळी पालिका निवडणुकीतही कडवा विरोध केला होता. एकत्र असताना जि.प. गट निवडणुकीत धनंजय यांनी संजय दौंड यांचा दोन वेळा पराभव केला होता. एक वेळा संजय दौंड यांनीही धनंजय मुंडेंच्या बंधूचा पराभव करून हिशेब चुकता केला होता.घरगुती कलहातून धनंजय मुंडे भाजपातून बाहेर पडून राष्टÑवादीमध्ये गेले. काकांशी संघर्ष करण्यासाठी, त्यांनी त्यांच्या विरोधकांशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. संजय दौंड हे त्यापैकीच एक नेतृत्व होते. गोपीनाथरावानंतरही दौंड यांनी पंकजा मुंडे यांच्याशी संघर्ष चालूच ठेवला. पंकजांचे राजकीय वर्चस्व कमी झाल्याशिवाय आपली उन्नती नाही, हे धनंजय व दौंड पिता-पुत्रासही कळून चुकले होते.
परळीतून मिळत नव्हती उमेदवारीक्षमता असूनही दौंड कुटुंबियांचे राजकारण जि.प.तील राजकारणापुरतेच मर्यादित राहिले होते. धनंजय मुंडेंमुळे परळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारीही मिळत नव्हती. धनंजय यांना निवडून दिल्यासच सर्व प्रश्न सुटणार आहेत, हे चाणाक्ष संजय दौंड यांनी ओळखले. शरद पवारांचा विश्वास जिंकत विधान परिषदेची उमेदवारी मिळवली.