शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:40 PM2023-08-29T21:40:47+5:302023-08-29T21:43:05+5:30
शरद पवारांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
मुंबई/बीड - अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी शरद पवारांपासून फारकत घेत थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरही दावा केला असून राष्ट्रवादीत २ गट पडले आहेत. त्यामुळे, अजित पवारांच्या बाजूने अनेक आमदार गेल्याने शरद पवार गटाने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली. त्यातच, अजित पवार गटातील नेत्यांना अडचणीत आणणाऱ्यांना संधी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाली. त्यावेळी, बबन गिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.
शरद पवारांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसेंची नियुक्ती करण्यात आली. तसेच, बीडमधील सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या बबन गितेंना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. बबन गिते हे परळीतील नेते आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंविरुद्ध हा पवारांचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बनन गिते हे परळी पंचायत समितीचे माजी सभापती असून परळीतील नेते आहेत. आता, बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचं समजतंय. बीड जिल्ह्यात बबन गिते विरुद्ध धनंजय मुंडे असा अंतर्गत वाद असून त्यामध्ये बबन गिते यांना शरद पवारांकडून बळ देण्याचा हा प्रयत्न आहे.
दरम्यान, राष्ट्रवादील पक्षप्रवेशाआधी बबन गिते यांनी तब्बल ७०० चारचाकी गाड्यांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. वैद्यनाथाचा अभिषेक करून बबन गिते शक्तीप्रदर्शन करत, आपल्यासोबत गाड्यांचा ताफा घेत परळीकडून बीडच्या सभेला पोहोचले होते. आता, धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातही बबन गिते यांच्या रूपाने विरोधक निर्माण झाला आहे.