बीड : केंद्र सरकार इस्लामच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो कदापिही चालणार नाही, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांनी दिला. तसेच त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
येथील मोमीनपुरा बायपास रोडवरवरील मैदानावर रविवारी रात्री एमआयएमच्या वतीने तहफूज - ए - शरितय व संविधान बचाव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा. ओवेसी बोलत होते.कार्यक्रमासाठी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, डॉ. गफार कादरी, मौलाना महेफूजूर रहेमान, सिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष निसार हुसेन हैदर आगा, एमआयएमचे बीड जिल्हाध्यक्ष शेख निजाम, अय्यूब जहागीरदार, नासेर सिद्दीकी, हर्षवर्धन घडशिंगे हे उपस्थित होते.
खा. ओवेसी पुढे म्हणाले, इस्लामच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने तीन तलाकचा कायदा लोकसभेत मांडला. त्याविषयी सर्व प्रथम आवाज उठविण्यात आला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने या प्रश्नी कायदेशीर लढाई सुरु केली असून, देशभर मूक मोर्चे काढण्यात आले.
तीन तलाकच्या आडून शरियतमध्ये होत असलेला हस्तक्षेप कदापीही सहन केला जाणार नाही. देशात दलित, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. याप्रश्नावरही सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप खा. ओवेसी यांनी केला. तसेच शरियतमधील हस्तक्षेप प्रश्नी लोकशाही मार्गाने लढा उभारणार असल्याचेही खा. ओवेसी यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक सभेसाठी उपस्थित होते.