बीड : चार महिन्यांपूर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे पे्रमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्यापेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे समजले. ही सर्व परिस्थिती अनुभवल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांच्या मदतीनेच ती आल्या पावली परतली. हा प्रकार शुक्रवारी बालेपीर भागात घडला. पे्रमात वेडा झालेला मुलगा बेपत्ता असून, याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
प्रत्येकाच्या हाती अँड्रॉईड मोबाईल आले आहेत. इंटरनेट असल्याने सर्व सुविधा मोबाईलमध्येच उपलब्ध झाल्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे. यातील फेसबुकच्या आहारी बीड शहरातील बालेपीर भागात राहणारा कलीम (नाव बदललेले) गेला. सध्या बारावीच्या वर्गात तो शिक्षण घेत आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याची फेसबुकवरून राजस्थानमधील जयपूर येथील मनीषा (नाव बदललेले) या २६ वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली. दोघांची चॅटींग वाढली. यातून त्यांची चांगलीच मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर कधी पे्रमात झाले, हे त्यांनाही समजले नाही.
आपण दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हे समजल्यावर त्यांनी लग्नाचा विचार केला. दोघांकडूनही लग्नासाठी होकार मिळाला. हा सर्व प्रकार केवळ मनीषा आणि कलीम या दोघांमध्येच होता. याची दोघांच्याही कुटुंबियांना तीळमात्र कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे मनीषाला बीडला बोलाविण्यात आले. शुक्रवारी ती एका चिमुकलीला घेऊन बीडला आली. कलीमने तिला बसस्थानकावरून घरी नेले. अचानक आपला मुलगा एका युवतीला घरी घेऊन आल्याने कुटुंबियही चक्रावले. कलीमने सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. परंतु त्यांनी यावर शांत राहणे पसंत केले.
सर्व माहिती घेतल्यावर मनीषा ही कलीमपेक्षा ९ वर्षांनी मोठी असल्याचे समजले. मनीषाने तात्काळ लग्नाला नकार दिला आणि आपल्याला औरंगाबादला सोडण्याची विनंती कलीमच्या कुटुंबियांकडे केली. त्यांनी तिला औरंगाबादला नेऊन सोडले. परंतु त्यानंतर अवघ्या काही तासांतच कलीमही घरातून बेपत्ता झाला. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. नातेवाईकांनी लगेच शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. घरातील १८ हजार रुपये देखील गायब असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सध्या बीड शहरात चर्चेचा विषय बनली आहे.
मुलगा बेपत्तामुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेतली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. लवकरच याचा तपास पूर्ण करू. मुलाचा शोध घेणे सुरू आहे. अद्याप तो सापडलेला नाही.- आर. ए. शेखपोउपनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड