कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बीड -जामखेड राष्ट्रीय महामार्गावर शेरी, खाकाळ वाडी ग्रामपंचायत आहे. साधारण तीन हजार चारशे लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. गावांसह वस्ती वरील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करून कायम गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या तरूणांच्या कामावर विश्वास ठेऊन सलग तीन वेळा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा मान गावकऱ्यांनी मिळविला आहे. गाव व वस्ती अंतर्गत रस्ते, लाईट, पिण्यासाठी शुध्दीकरण केलेले पाणी, मंदिर शाळा सुशोभीकरण, तरूणाला वाचनाची आवड लागावी म्हणून वाचनालय सोबतच व्यायामशाळा, अंडर ग्राऊंड गटारी, ठिकठिकाणी शोषखड्डे, याच बरोबर पाणी टंचाई मात करण्यासाठी आणि संपूर्ण गाव टँकरमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणीदार शिवार केल्याने पाण्याची टंचाई कायम दूर झाली.
आता शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय नविन इमारती उभारणार असुन महादेव मंदिर घाट, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, समाज मंदिर बांधकाम करण्याचा मानस असून गावच्या विकासासाठी कायम झटणार असल्याचे ग्रामपंचायतीचे शिलेदार संदिप खाकाळ, दिपक सोनवणे यांनी सागितले.
पुष्पा खाकाळ, पंचफुला सोनवणे, विजय खाकाळ, मालती शिरोळे, भारती भालेकर, स्वाती गोरे, विठ्ठल गोरे, साहेबराव माळी, लताबाई वाघुले, या नवीन सदस्यांचा मराठमोळ्या पदध्तीने सत्कार करण्यात आला.