- अविनाश कदम आष्टी (बीड) : संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल होत असतात. या सोहळ्याला उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. गडाच्या परिसरात हेलिपॅड उभारण्यात आले असून परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिंड्या गडाकडे रवाना झाल्या आहेत. आज सायंकाळीच अनेक भाविक गडावर पोहचतील.
दरम्यान, उद्या सकाळी ९ वाजता किर्तन असेल. तर १ वाजेच्यानंतर महाप्रसाद होईल. टाळ, मृदुंग, पताका घेऊन गडाच्या दिशेने दिंड्या रवाना झाल्या आहेत. या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी अनेक भाविक संत वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होत असतात.