बीड : शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनरवर अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. यावर लगेच खांडे यांनी जुन्या बॅनरवरून दोघांचेही फोटो हटवून त्या ठिकाणी नवे बॅनर बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेनेत सध्या फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यभर आपले जाळे तयार केले. बीडमध्येही शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केलेले कुंडलिक खांडे आणि सचिन मुळूक हे दाेघे शिंदे गटात गेले. या दोघांनाही जिल्हाप्रमुख पद दिले. त्यांच्या निवडीहून दीड महिना उलटल्यानंतरही खांडे यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या दोघांचे फोटो होते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राजकीय चर्चा रंगली होती. याच अनुषंगाने खांडे यांनी लगेच बॅनरवरून दोघांचेही फोटो हटविले आहेत. आता त्याच ठिकाणी नवे बॅनर बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.