तालुक्यातील शिंदीफाटा ते घाटेवाडी या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र सध्या चालू असलेले काम कंत्राटदाराकडून घाई-गडबडीने उरकण्याचा घाट घातला जात आहे. हा रस्ता गप्पेवाडी, नामेवाडी, घाटेवाडी या गावांना जोडणारा असल्याने रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता कामावर जाऊन हाताने रस्ता उखडत असल्याचे कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून देत कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. तरीही ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काम उरकण्यात येत आहे. या कामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कामाचा दर्जा न सुधारण्यास याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिला आहे.
शिंदीफाटा - घाटेवाडी रस्ता कामाचा दर्जा निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:02 AM