शिरूर कासार : आरोग्य विभागातील दैनंदिन कामकाजासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत शिरूर तालुका जिल्ह्यात अग्रस्थानी राहिला असून गुरुवारी एकाच दिवसात १८८५ लोकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा आकडा आता पन्नास हजारांपर्यंत पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, सहशिक्षक हे लसीकरण कार्यक्रमात सहभागी आहेत. योग्य नियोजन व अंमलबजावणीमुळे शिरूर तालुका जिल्ह्यात प्रथम असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात खालापुरी उपकेंद्र व शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ही लसीकरणाची मोहीम सुरू आहे. गुरुवारी तब्बल १८८५ लोकांना लस देऊन उच्चांक गाठला. याकामी खालापुरी उपकेंद्रात १३३९ तर शिरूर केंद्रात ५४६ लसीकरणाचे काम झाले. तालुक्यात ९ सप्टेंबरपर्यंत शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १७२०८ पहिला डोस तर ७४८२ दुसरा डोस असे २४ हजार ६९० नागरिकांचे लसीकरण झाले. खालापुरी उपकेंद्रामार्फत पहिला डोस १६०२१ व दुसरा ४३० असे एकूण २० हजार ३२१ जणांचे लसीकरण झाले. तालुक्यात एकूण ४५ हजार ११ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लवकरच पन्नास हजाराचा टप्पा गाठणार असल्याची माहिती देण्यात आली.
लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर खाडे, पर्यवेक्षक बिजू ढाकणे, मीरा तांबे, हिराबाई नागरगोजे, राजश्री डमाळे, संगीता अधापुरे, शिल्पा बनकर, वामन मनीषा, रेखा तोडकर, आशा बडे, स्वाती माळी, शोभा वाघुलकर, शिवकन्या मैंदड व ऑनलाइनसाठी असणारे शिक्षक लखुळ मुळे, नितीन कैतके, बालासाहेब कराड, अभिमान कातखडे, खालापुरी येथे डॉ. सुहास खाडे, डॉ. विशाल मुळे यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.