लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ असा जयघोष करीत शिवप्रेमींनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी ७०१ शिवप्रेमींनी जयंतीच्या निमित्ताने रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे शिवप्रेमींनी दाखवून दिले. हा आदर्श यापुढेही कायम ठेवणे गरजेचे आहे. दिवसभर जिल्हा रुग्णालयाची टिम धावपळ करताना दिसून आले.छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या, असा संदेश वेगवेगळ्या व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रमातून ऐकावयास मिळतो. हे प्रत्यक्षात शिवप्रेमींनी मंगळवारी करून दाखविले. शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघटना, प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्ते, समितींच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा रूग्णालयाकडे तब्बल ५६० तर खाजगी रक्तपेढीकडे १४१ शिवप्रेमींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश हरिदास, डॉ. आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढी प्रमुख डॉ. जयश्री बांगर, डॉ.संतोष कदम, डॉ.राम मोहिते यांच्यासह केज, गेवराई, माजलगाव, परळी येथील ब्लड स्टोरेजची टीम, आरबीएसकेची सर्व टीम रक्तसंकलनासाठी धावपळ करीत होती. जिल्ह्यात एकूण १० टीम नियूक्त केल्या होत्या.
शिवजयंतीला पहिल्यांदाच विक्रमी रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:03 AM