बीड : सोमवारी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे काही मतदार संघातील समिकरणे आतापासूनच बदलू लागली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बीड येथील बैठकीत उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर केज मतदार संघाच्या भाजपच्या विद्यमान आ. संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीचा पत्ता अखेर कट झाला. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ए बी फॉर्म सुपूर्द करीत जयदत्त क्षीरसागर यांना बीड मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी दिली.
सोमवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले. राज्याच्या राजकारणाची दिशा बीड जिल्हा ठरवतो. कै. विमल मुंदडा यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध होते. कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने विमलताई यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. पुन्हा हे कुटुंब भाजपात परत आल्याचा आनंद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
आज शिवसेनेची बैठकबीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे ३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर १ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डी. पी. रोडवरील सूर्या लॉन्स येथे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणऱ्या या बैठकीला सर्व शिवसेना, अंगीकृत संघटना, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.