पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त झाले असून, ही बाब लक्षात घेत परळी शिवसेनेच्या वतीने गॅस सिलिंडर तिरडीवर ठेवत व बैलगाडीत मोटारसायकलची वरात काढून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी, निदर्शने करीत शहरातील मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून आंदोलनास सुरुवात झाली. पुढे मोंढा मार्केट, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे तहसील कार्यालयावर आंदोलक धडकले. तहसीलदारांना इंधन दर कमी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभुते, भविसे जिल्हा संघटक अतुल दुबे, रमेश चौंडे, राजा पांडे, रामराव माने, सतीश अण्णा जगताप, संतोष चौधरी, मोहन राजमाने, किशन बुंदेले आदींनी परिश्रम घेतले. असंख्य शिवसैनिक व नागरिक या आंदोलनास उपस्थित होते.