बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप हल्ला प्रकरणाचे धागेदोरे शिवसेनेमध्येच असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी पकडलेल्या दोन आरोपींना ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर खदखद व्यक्त केली होती. राष्ट्रवादीसह स्वपक्षीय नेत्यांवरही त्यांनी उघड टीका केली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी घोडका राजुरी पुलावर त्यांच्यावर हल्ला चढवून पुलावरून फेकण्याचा प्रयत्न झाला होता. पिंपळनेर ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून १४ जणांवर गुन्हा नोंद झाला. मात्र, जगताप यांच्या तक्रारीत नमूद आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण आले होते. पिंपळनेर पोलिसांनी तपास केला तेव्हा जगताप यांच्या तक्रारीत उल्लेख असलेले आरोपी घटनास्थळी नव्हतेच, ही बाब उघड झाली. तपास गतिमान केला तेव्हा ३ सप्टेंबर रोजी दत्ता जाधव व ईश्वर देवकर (दोघे रा. पेठ बीड) हे दोन आरोपी गळाला लागले. ते शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती असून त्यामुळे या हल्ल्यामागे जगताप यांचे पक्षांतर्गत शत्रूच असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या दोघांनी कोणाच्या इशाऱ्यावरून जगताप यांच्यावर हल्ला चढविला, याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी दिली.
....
दोन्ही गटांच्या तक्रारी नोंद आहेत. मात्र, तपासात जे तथ्य समोर आले, त्यानुसार कारवाई सुरू आहे. पकडलेल्या दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासातच निष्पन्न होईल.
- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड
....