बीड : यावर्षी कोरोनामुळे मिरवणूक नसल्याने शिवभक्तांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करून एक आदर्श निर्माण केला. दोन दिवसांत तब्बल ७८५ जणांनी जिल्हाभरात रक्तदान केले. हे रक्त संकलन जिल्हा रूग्णालयातील शासकीय रक्तपेढीमार्फत करण्यात आले. २५ फेब्रुवारीपर्यंत रक्तदान शिबिरे सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात बीड शहरासह धारूर, मादळमोही, गेवराई, मुर्शदपूर फाटा, आर्वी, वडवणी, धारूर, चिंचवण येथे शुक्रवारी रक्तदान शिबीरे घेण्यात आली. तसेच गुरूवारीही जिल्हाभरात ठिकठिकाणी शिबीर घेऊन शिवभक्तांनी रक्तदान केले. दाेन दिवसांत तब्बल ७८५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यासाठी प्रत्येक ठिकाणी आरबीएसकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, ब्रदर्स, रक्तपेढीतील तंत्रज्ञ, कक्षसेवक या सर्वांची नियूक्ती केली होती. या पथकांनी परिश्रम घेऊन हे रक्तसंकलन केले. विशेष म्हणजे २५ फेब्रुवारीपर्यंत हे शिबीरे सुरू राहणार असल्याने रक्तपेढीत रक्तपिशव्यांची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. शिवभक्तांनी रक्तदान करून महाराजांना अभिवादन केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ.सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.औदुंबर नालपे, मेट्रन संगिता दिंडकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांनी शासकीय रक्तपेढीच्या प्रमुख व त्यांच्या पथकाला मार्गदर्शन व सहकार्य केले.