पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच भारत जवळकर, उपसरपंच राजाभाऊ गवळी, संजय नरवडे, रमेश जाधव, राहुल गणगे, भारत ढेगे, सुदर्शन कुंभार उपस्थित होते.
खडकी येथे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात
वडवणी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खडकी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ.महादेव मुंडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी जयंती समितीच्या वतीने जवान रामप्रसाद भारत करांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोविंद दराडे, नितीन चोले, ज्ञानेश्वरी दराडे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
तात्काळ नुकसानभरपाई द्यावी
बीड : बीड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, फळभाज्यांचे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक ज्ञानेश्वर कवठेकर यांनी केली आहे.
लॉकडाऊनची भीती, छोटे व्यावसायिक चिंतेत
आपेगाव : सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांना पुन्हा लाॅकडाऊन होतो की, काय यांची चिंता लागली आहे. हातावरचे पोट भरण्यासाठी प्रत्येक छोटा व्यावसायिक दिवसरात्र एक करत आहेत. यातच पुन्हा वेळेचे बंधन लागू केल्यास खाद्यपदार्थ विक्रेते, सलून, पानटपरी, हातगाडीचालक, मजुरांना फटका बसणार आहे.
केएसके महाविद्यालयात विविध उपक्रम
बीड : के.एस.के.महाविद्यालयात प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर स्वच्छ केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.एस.हंगे,उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर आदी उपस्थित होते.
पावसाने गळून पडला आंब्याचा मोहोर
बीड : गतवर्षी मोहोर न फुलल्याने आंब्याची टंचाई जाणवली होती. यंदा मात्र, झाडांना समाधानकारक प्रमाणात मोहोर आल्याने आंब्याची टंचाई जाणवणार नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने बहुतांश ठिकाणी मोहोर गळून पडला. त्यामुळे यंदाही गतवर्षीसारखी परिस्थिती होणार अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती शाळा, कार्यालयात साजरी करावी
बीड : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व शासकीय, निमशासकीय कार्यालयात कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष अध्यक्ष अॅड. सुधीर जाधव यांनी केले आहे.