लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : प्रसिद्ध शिवव्याख्याते ज्ञानदेव काशिद यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवरून लोकांंना पैसे मागणारे संदेश जात आहेत. याबाबत त्यांनी बीड येथील सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे.
ज्ञानदेव काशिद यांचे त्यांच्या नावाने फेसबुक पेज आहे. ह्या पेजला ४० हजार लोकांनी लाईक केलेले आहे. सदरील पेजचे १ लाख ३ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सदरील पेज हॅक झाल्यानंतर त्या पेजवरून आक्षेपार्ह स्टोरी स्टेट्स अपडेट होत आहेत. या पेजचा संपूर्ण कंट्रोल हॅकर्सकडे गेला आहे. त्यांना फाॅलो केलेल्या लोकांना मेसेंजरवर पैसे मागणी करणारे संदेशही येत आहेत. यासंदर्भातील तक्रार अर्ज बुधवारी स्वतः ज्ञानदेव काशिद यांनी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात केला आहे. फेसबुकलाही हा सर्व प्रकार कळवून सदरील पेज तत्काळ रद्द करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच त्यांनी इतरांच्याही फेसबुक पेजवर असे अनधिकृत कृत्य घडू नये यासाठी व्हॉट्स ॲपवर येणाऱ्या मेसेजला रिप्लाय न देता कुठलीही लिंक पुढे फॉरवर्ड न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.