बीड : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला २६ जानेवारीपासून सुरूवात झाली. बीडमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या केंद्रावर दररोज अवघ्या एका तासातच शिवभोजन संपून जाते. त्यामुळे तृप्तीसाठी आलेल्या सामान्य गरजूंना आल्या पावली परतावे लागत आहे. गेल्या ११ दिवसांत केवळ ८८० गरजू लाभार्थीच या शिवभोजनाचा लाभ घेऊ शकले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजूंना गुणवत्ता राखून केवळ १० रुपयांत ताजे भोजन देण्याची योजना आहे. बीडमधील केंद्रावर योजना सुरू होऊन ११ दिवस झाले आहेत. मात्र प्रतिदिन ८० ताटांचीच मर्यादा असल्याने १२ ते १ या वेळेतच शिवभोजनाचा कोटा संपून जातो. या केंद्रावर भोजन मिळण्याची वेळ ही दुपारी १२ ते २ वाजेची आहे. मात्र, सकाळी ११ वाजेपासूनच यासाठी गरजू प्रतीक्षा करतात. आॅनलाईन लिंक सुरु होताच रांगेतील व्यक्तीचा फोटो काढून त्याचे नाव, आधार क्रमांक नोंदल्यानंतर शिवभोजन अॅपद्वारे केंद्र चालकाला टोकन दिले जाते. त्यानंतर नोंदीत गरजूला टोकन क्रमांकानुसार दहा रूपयात शिवभोजन थाळी दिली जाते. आलेल्या पहिल्या ८० गरजूंना याचा लाभ मिळतो आणि तासाभरातच ते संपते. त्यामुळे नंतर आलेल्यांना ‘शिवभोजन संपले’ असे उत्तर मिळते. परिणामी, हिरमुसलेपणाने त्यांना आल्या पाऊली परतावे लागते आणि जेवणाची पर्यायी व्यवस्था करावी लागते. बीड येथील शिवभोजन केंद्राच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे गरजू तसेच विद्यार्थी येथे येतात; परंतु तासाभरात शिवभोजनाचा कोटा संपत असल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते.
अशी आहे शिवभोजन थाळीशिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात, १०० ग्रॅमच्या एक वाटी वरणाचा समावेश असून दुपारी १२ ते २ या कालावधीत शिवभोजन देण्याचे निर्देश आहेत.
सेंटरवर सकाळी अकरा ते साडेअकरादरम्यान शिवभोजनासाठी ग्राहक येतात. ८० ताटांचीच सध्या मर्यादा आहे. शिवभोजन अॅपवर नोंदणीनंतर टोकनप्रमाणे संबंधित लाभार्थ्याला थाळी दिली जाते. तांत्रिक अडचणी आलेल्या नाहीत. - योगेश शिंदे, शिवभोजन केंद्र.