केज (बीड ) : पंचायत समितीच्या नरेगा विभागात लाभार्थींची आर्थिक अडवणूक केली जाते असा आरोप करत येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. तसेच गेट बाहेर एक तास ढोल बजाव आंदोलन केले.
तालुक्यातील वीडा ग्रामपंचायत अंतर्गत 16 शेतकर्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जलसिंचन विहिरीना दिनांक 27 एप्रिल 2017 रोजी तांत्रिक मंजूरी पंचायत समिती स्तरावरुन मिळाली. असे असतानाही केवळ एकाच शेतकऱ्याला देयक देण्यात आले आहेत. यामुळे नरेगा विभागात भ्रष्टाचार झाला असून येथील कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली. गटविकास अधिकारी गुंजकर यांनी नरेगा विभागाचे एपीओ थोरातसह इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करुन दहा दिवसांत नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयाचे कुलूप काढले.
आंदोलनात शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे, वीडा ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी वाघमारे, गणेश खांडेकर, पंडीत चाळक , प्रकाश रोमन , किशोर काळे , रवि गायकवाड , अशोक चाळक , शुभम पटाईत , अमोल चाळक ,शक्तिमान पालवे ,नाना नेमट, राम राऊत आदींचा सहभाग होता.