गेवराई (बीड ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने काढलेला शेतकरी हक्क महामोर्चा आज दुपारी तहसील कार्यालयावर धडकला. आज माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या या मोर्चात अनेक शेतकरी बैलगाडीसह या सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी गाळपास दिलेल्या उसाचे एफ आर पी प्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखाना गढी आणि महेश साखर कारखाना माजलगाव यांनी तात्काळ शेतकऱ्यांना पेमेंट द्यावे, दुष्काळग्रस्त जाहीर करावा, वन्यप्राणी बाधित क्षेत्र आणि अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावे, नाफेडला दिलेल्या तुरीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत, वाहतूकदार ऊसतोड मजूर यांचे डिपॉझिट कमिशन तात्काळ द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयावर विराट शेतकरी हक्क महामोर्चा काढण्यात आला.
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा पंचायत समिती काॅर्नर, शास्त्री चौक,दाभाडे गल्ली मार्गे तहसील कार्यालय असा निघाला. तहसीलसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चात जि.प.सभापती युद्धजीत पंडीत, पं.स.सभापती अभयसिंह पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे, अजय दाभाडे, रोहित पंडित, भिष्माचार्य दाभाडे, उज्वला वोभळे, विजयकुमार वाव्हळ,बप्पासाहेब तळेकर,अमोल करांडे, शिनुभाऊ बेदरे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा बैलगाडीसह सहभाग होता.