माजलगाव ( बीड ) : पवारवाडी येथील जय महेश कारखान्याने डिसेंबरपासून गाळप केलेल्या उसाचे ११० कोटी रूपये थकविले आहेत. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील तीन महिन्यांपासुन गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कारखान्याने थकविलेली थकीत रक्कम सुमारे ११० कोटी एवढी आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी आज सकाळी कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन कारखाना उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना देण्यात आले. यावर लोखंडे यांनी आठ दिवसांत ऊस बिलाची रक्कम टप्याटप्याने देण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. आंदोलनात आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, अशोक आळणे, नितीन मुंदडा, शिवमुर्ती कुंभार, दत्ता रांजवण यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.