बीड : औरंगाबादच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हिरापूर जवळ आग लागली. गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. यातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या बसमधून औरंगाबादला पाठविण्यात आले आहे.
या गाडीमधील नवगण राजुरी येथील प्रवासी मनोज थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड आगारातून औरंगाबादच्या दिशेने निघालेली शिवशाही बस ((MH- 06 - BW 0646 ) सकाळी ११. १५ वाजेला हिरापूर जवळ आली असता त्यामधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने लागलीच बस रस्त्याच्या बाजूला घेतली. यानंतर बसमधील अग्निशमन यंत्र वापरत चालक व प्रवाशांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना इतर बसमधून औरंगाबाद दिशेने पाठविण्यात आले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्राथमिक अंदाजानुसार गाडीतील एसी यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागली असावी.