किल्लेधारूर (बीड): पतसंस्थेकडून कर्जफेडीसाठी तगादा वाढल्याने व्यथित झालेल्या बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आसरडोह येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन लक्ष्मण पाटोळे (34, रा. आसरडोह ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पाटोळे यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
धारूर तालूक्यातील आसरडोह येथील नितीन लक्ष्मण पाटूळे हे बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१९ साली मंगलनाथ मल्टीस्टेट को. ऑ. क्रेडीट सोसायटीकडून कर्ज घेतले होते. काही दिवसांपासून कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा वाढला होता. यामुळे पाटूळे व्यथित होते. यातूनच त्यांनी आज सकाळी आसरडोह येथील तलावा शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सचिन सिध्देश्वर हे घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
कर्जाचा तगादा वाढल्याने उचलले टोकाचे पाऊल मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून 2019 साली वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र, कोरोना काळात काही हप्ते थकले. त्यानंतर जून 2022 रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते. परतू, मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता. त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते. यामुळे पाटोळे व्यथित होते. यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे जामीनदार, सहकारी शिक्षक रावसाहेब तिडके यांनी सांगितले.