अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा
By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2023 05:33 PM2023-10-30T17:33:36+5:302023-10-30T17:34:13+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे.
बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण व उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी साेमवारी राजीनामा दिला आहे. दोघांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.चव्हाण व गवते यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे.
आमदार प्रकाश सोळंकें विरोधात संताप
दरम्यान, अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकें यांच्या विरोधात आज सकाळी मराठा आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी सोळंकें यांच्या घरावर दगडफेक करत गाड्याही जाळल्या. त्यानंतनर आंदोलकांनी शहरात दगडफेक करत नगरपरिषद कार्यालय देखील जाळले एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.