बीड : माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील दोन कोरोनाग्रस्त हे एका ट्रॅव्हल्समधून मुंबईहून गावी आले. याच ट्रॅव्हल्समध्ये तब्बल ४० प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या लोकांना प्रशासनाने परवानगी दिलीच कशी? आणि दिली नसेल तर रस्त्यात चेकपोस्ट व इतर गस्तीवरील पोलिसांनी अडवले का नाही, अशी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तब्बल ४० जणांनी सोबत प्रवास केल्याने सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट आहे. या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यामुळे बीडकरांची धाकधूक वाढली आहे.
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील एक कुटूंब लॉकडाऊनच्या अगोदर दोन दिवसांनी मुंबईला गेले होते. लॉकडाऊन वाढत गेल्याने ते तिथेच अडकले. ११ मे रोजी ते एका खाजगी ट्रॅव्हल्समधून गावी आले. या ट्रॅव्हल्समध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटूंबातील चौघे व इतर ३६ लोक होते. हे सर्व माजलगाव व वडवणी तालुक्यातील रहिवाशी होते. मुंबईहून निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात कोठेही अडविले किंवा हटकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. गावात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना लक्षणे जाणवू लागली. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केल्यानंतर प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले. यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले सर्वच प्रवासी व गावात आल्यानंतर संपर्कात आलेले सर्व नातेवाईकांना स्वॅब घेण्यासाठी माजलगाव व बीडला पाठविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच प्रवासी त्यांच्या अगदी जवळून संपर्कात आल्याने अहवालाबाबत धाकधूक वाढली आहे.
व्यक्तिगत नव्हे तर सार्वजनिक परवानगीआरोग्य विभागाच्या पथकाने या कोरोनाग्रस्तांची माहिती घेतली. एका खाजगी सराव करणाऱ्या डॉक्टरचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे होते. परंतु, येण्यासाठी व्यक्तीगत परवानगी नव्हती. ट्रॅव्हल्सवाल्यांकडेच ही परवानगी असल्याचे समजते. परंतु, असे असले तरी एका ट्रॅव्हल्समध्ये एवढ्या लोकांना परवानगी दिलीच कशी? आणि नसेल दिली तर गावी येईपर्यंत कोणीच कसे हटकले नाही, असा प्रश्न उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
दोघांचे स्वॅब दुसऱ्यांदा घेणारयाच कोरोनाग्रस्तांच्या सोबत मुंबईहून आलेल्या त्यांच्याच कुटूंबातील दोघांचे स्वॅब १७ मे रोजी घेतले होते. परंतु त्याचा निष्कर्ष निघत नसल्याने ४८ तासांनी पुन्हा स्वॅब घेण्यास प्रयोगशाळेकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्या दोघांचे मंगळवारी रात्री दुसऱ्यांदा स्वॅब घेतले जाणार होते. त्यांना लक्षणे जाणवत असल्याचेही समजते. त्यामुळे अहवाल काय येतो? याकडे लक्ष लागले आहे.
कवडगाव थडी येथे मुंबईहून आलेल्या लोकांना तात्काळ क्वारंटाईन केले. लक्षणे जाणवताच स्वॅब घेण्यासाठी पाठविले. त्यांच्या कागपत्रांची तपासणी केली असता एका खाजगी डॉक्टरचे प्रमाणपत्र होते. वैयक्तिक परवानगी नाही दिसली. सार्वजनिक परवानगीबद्दल सांगता येणार नाही. एकाच ट्रॅव्हल्समध्ये ४० लोक आल्याचे ते सांगतात. त्यांच्या संपर्कातील लोकांची यादी काढली आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जात आहे. - डॉ.आकाश राठोड, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, टाकरवण