- सोमनाथ खताळ
बीड : बीड जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. गरज नसतानाही काही महिलांना परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जात असल्याचे दिसले. तपासणी केल्यानंतर गरज नसल्याचे सिद्ध झाले. याच अनुषंगाने माहिती घेतली असता मागील १५ महिन्यांत जिल्हाभरात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारीपेक्षा खासगीतील आकडेवारी दुप्पट असल्याचे दिसते.
गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी बंधनकारक आहे. असे असतानाही खासगी डॉक्टरांनी पाठविल्यानंतर सरकारी डॉक्टरही शस्त्रक्रिया करण्यास योग्य असल्याचा अहवाल देत आहेत; परंतु स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी तपासल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सिद्ध होते. कमी वय व औषधोपचारावर ठीक होत असल्याचा मुद्दा ठेवून सीएसकडून परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे जे सीएस करतात, तेच सरकारी डॉक्टर का करत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त होत असून गर्भाशय काढण्याचा धंदा पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.
पूर्ण तपासणी केली जाईल परवानगी दिलेल्या लोकांचीच नोंद ठेवली जाते. नाकारलेल्यांची यापुढे नोंद ठेवली जाईल. खासगीतून आलेल्यांना सरकारी डॉक्टरांनी तपासून माझ्याकडे शिफारस केली तरी मी पुन्हा तपासणी करतो. यात मला गरज नसल्याचे वाटल्यानेच परवानगी नाकारली. आता या प्रकरणात लक्ष घालून पूर्ण तपासणी केली जाईल.- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
अशी आहे आकडेवारीखासगीतील शस्त्रक्रियाबीड १८९परळी ८४आष्टी ६केज ६
सरकारीतील शस्त्रक्रियास्वाराती, अंबाजोगाई २३२जिल्हा रुग्णालय ४उपजिल्हा रुग्णालय परळी ४उपजिल्हा रुग्णालय केज १खासगीतील एकूण शस्त्रक्रिया ४१०सरकारीतील एकूण शस्त्रक्रिया २४१