- नितीन कांबळे कडा ( बीड) - बँक व्यवस्थापकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेत कार्यरत असणाऱ्या लिपिकाने बँकेचे 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याचा प्रकार आष्टी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदरील लिपीका विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत अंकुश अनारसे (रा.मोरेवाडी तालुका आष्टी) असे बँकेच्या लिपिकाचे नाव आहे. तो महेश मल्टीस्टेट बँकेच्या आष्टी शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. 11 जानेवारी 2023 ते 27 जानेवारी 2023 या काळात त्याने बँकेचे शाखा व्यवस्थापक नवनाथ पांडुरंग अनारसे (वय 46 रा.देवी निमगाव तालुका आष्टी) यांचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेचे तब्बल 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. विशेष म्हणजे, लिपिकाने हे करत असताना बँकेची एसएमएस सेवा बंद केली होती. यामुळे व्यवस्थापकास याबाबत काहीच मेसेज आला नाही. दरम्यान, हा प्रकार बँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर व्यवस्थापक नवनाथ पांडुरंग अनारसे यांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली. यावरून भरत अंकुश अनारसे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम करत आहेत.