बीड : जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थेत २६३ व्हेंटिलेटर आहेत; परंतु यातील तब्बल ९९ व्हेंटिलेटर हे सद्यस्थितीत विविध कारणांमुळे बंद असल्याचे समोर आले आहे. या सर्वांची दुरुस्ती सुरू असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सद्यस्थितीत रुग्णांचे हाल होत आहेत. यावर तातडीने कार्यवाही करून व्हेंटिलेटर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या नव्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वृद्ध रुग्णांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते, परंतु अशावेळी शासकीय आरोग्य संस्थेतील व्हेंटिलेटर अपुरे पडतात. रुग्ण व नातेवाईकांना व्हेंटिलेटर नाही, असे उत्तर देऊन आरोग्य विभाग हात झटकत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मात्र रुग्णांचे हाल होत असून तडफडत असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने मात्र या गंभीर परिस्थितीत आढावा घेऊन सर्व व्हेंटिलेटरची अवस्था पाहणे आवश्यक होते, परंतु वर्षभरापासून ही महामारी सुरू असतानाही आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतरही ते शांतच असल्याने संताप व्यक्त होत आहे. वेळेवर उपचार आणि सुविधा मिळत नसल्याने कोरोनाबळींसह सामान्य नागरिकांचे मृत्यू वाढत आहेत. यावर आरोग्य विभागाने तत्काळ कार्यवाही करून सामान्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते विभागीय उपायुक्त यांच्या बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.
आष्टी, माजलगावात व्हेंटिलेटर धूळखात
आष्टी व माजलगाव येथे १० व्हेंटिलेटर देण्यात आलेले आहेत, परंतु अद्यापही ते कार्यान्वित न केल्याने धूळखात पडून आहेत. व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांना बीड अथवा अंबाजोगाईला जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तर काही नातेवाईक रुग्णांना खासगी रुग्णालयात घेऊन जातात. येथे त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसते.
नियोजन नसल्याने बिकट परिस्थिती
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता नियोजन करणे आवश्यक होते. सुविधा व उपचाराबद्दल तक्रारी आहेत. तसेच गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याचीही ओरड आहे. असे असले तरी बंद व्हेंटिलेटर तत्काळ दुरुस्त करण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करून हाेता. केवळ नियोजनाचा अभाव असल्याने ९९ व्हेंटिलेटर विविध कारणांमुळे बंद असल्याचे सांगण्यात आले.
खासगीत लाखोंची लूट
सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर मिळत नसल्याने लोक रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जातात. परंतु येथेही व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी वशिला लावावा लागतो. कसा तरी बेड मिळाला तर लाखो रुपयांची लूट केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
---
अशी आहे आकडेवारी
शासकीय संस्थेतील व्हेंटिलेटर २६३
कार्यान्वित केलेले व्हेंटिलेटर २५३
दुरुस्ती सुरू असलेले व्हेंटिलेटर ८९
कार्यान्वित न केलेले व्हेंटिलेटर १०