बीड : कारवाईची माहिती गोपनिय असतानाही ती बाहेर दिल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. तसेच सहकार्य केल्याप्रकरणी दुसऱ्या कर्मचाऱ्याला मुख्यालयी पाठविले आहे. ही कारवाई गुरूवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केली.
शिवदास घोलप असे निलंबीत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून अनंत गिरी यांना मुख्यालयात पाठविले आहे. काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यात नृतिका नाचविणाऱ्यावरून वाद झाला होता. गावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. येथे कारवाई चालु असतानाच यातील ओळखीच्या आरोपींना सोडण्यासाठी शिवदास घोलप यांनी हस्तक्षेप केला. शिवाय अंतर्गत माहिती बाहेर सांगितली. हाच ठपका ठेवून त्यांच्यावर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी निलंबणाची कारवाई केली. तर अनंत गिरी यांनी घोलप यांना सहकार्य केल्याप्रकरणी त्यांना मुख्यालयात पाठविले. या दोघांचीही खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचेही श्रीधर म्हणाले.
पथकातील विश्वासू कर्मचारी फुटलेअधीक्षक जी.श्रीधर यांनी दोन विशेष पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत मोठमोठ्या धाडसी कारवाया केल्या. विश्वासू पथक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु या कारवाईने आपलेच पोलीस कर्मचारी विश्वासघात करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अधीक्षकांचे पथकावरही संशय व्यक्त केला जात आहे. हे दोन्ही कर्मचारी अधीक्षकांच्या विशेष पथकात कार्यरत होते.