बीड : शहरातील आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमधून एका आरोपीने पलायन केले होते. त्याला मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. यात पोलिसांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोभाटा केला आहे. प्रत्यक्षात त्याचा स्वॅबच घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. बीडपोलिसांनी प्रेस नोट काढून माध्यमांना खोटी माहिती दिल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. त्यामुळे माध्यमांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड ग्रामीण पोलिसांनी एका दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड केले होते. या सर्वांचे स्वॅब घेतले असता एक दरोडेखोर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील इतरांना आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. २५ जुलै रोजी यातील किशोर पवार या दरोडेखोराने तेथून पलायन केले होते. त्याला मंगळवारी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह होता. आम्ही सर्व खबरदारी घेऊन त्याला गायरानातून पकडल्याचा बोभाटा बीड पोलिसांकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या आरोपीला केवळ क्वारंटाईन केले होते. त्याचा स्वॅब घेतलाच नव्हता. स्वॅब नसतानाही पोलिसांनी कामगिरीचा बोभाटा करण्यासाठी माध्यमांना एका प्रेसनोटद्वारे खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याचा स्वॅब घेतलेला नसतानाही त्याला पॉझिटिव्ह दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते.
कारागृहातही नोंद नाहीआतापर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेले पाच आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सर्वांवर जिल्हा रुग्णलयात उपचार करण्यात आलेले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या एकाही रुग्णावर आयटीआयमध्ये उपचार झालेले नाहीत. तसेच या पाचही आरोपींची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली होती. या पाच मध्ये किशोर पवारचे नावच नसल्याचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी सांगितले. आता तो पुन्हा क्वारंटाईन कारागृहात आला असून त्याचा स्वॅब घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकशी केली जाईल कोरोना पॉझिटिव्ह यादीत या व्यक्तीचे नाव सापडलेले नाही. अधिक चौकशी केली जाईल. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
स्वॅब घेतला नव्हतासंबंधित नावाचा व्यक्ती पळून गेला होता, हे खरे आहे. पण तेव्हा तो क्वारंटाईन होता. त्याला सात दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यासाठी सीसीसीमध्ये आणले होते. त्याचा स्वॅब घेतला नव्हता. स्वॅबच नाही तर पॉझिटिव्ह येण्याचा संबंधच येत नाही. - डॉ.अमित बायस, प्रमुख, कोवीड केअर सेंटर आयटीआय बीड
तो आरोपी पॉझिटिव्ह होता. एलसीबीकडून तसे सांगण्यात आले आहे. - विलास हजारे, जनसंपर्क अधिकारी, बीड पोलीस