गेवराई : शहराजवळील गोविंदवाडी शिवारात एका महिलेने शेतात प्रसूत होऊन स्त्री जातीच्या अर्भकास तेथेच सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १ ) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी अर्भकास बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले असुन त्याची प्रकृती स्थिर आहे.
गोविंदवाडी शिवारातील यशवंत गोरे याच्यां शेतातील गवतात सोमवारी सकाळी एका अज्ञात महिलेने प्रसुत होवुन एका स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. मात्र यानंतर अर्भक तेथेच सोडून मातेने पलायन केले. सकाळी दहा वाजता गोरे शेतात कामानिमित्त आले असता गवतातुन लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहणी केली असता तेथे एक लहान मुल उघड्यावर पडलेले दिसले. त्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चोभे, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोलिस गणेश तळेकर, संतोष गाडे, सरपंच शिवाजी डिंगरे, प्रकाश घाडगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा पोलीसांनी केला असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.