बीड : तालुक्यातील वैतागवाडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर त्याच खोलीत आठ महिन्यांची गरोदर असलेल्या पत्नीचा संशयास्पद मृतदेह गुरुवारी आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, गूढ कायम आहे.
राजेश भालचंद्र जगदाळे (२५) व दीपाली राजेश जगदाळे (२०, दोघे रा. वैतागवाडी, ता. बीड) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. ११ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दीपाली आठ महिन्यांची गर्भवती होती. राजेश शेती करायचा, तर दीपाली घरकाम करायची. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता राजेशने घरात दोरीेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले, तर पत्नी दीपालीचा मृतदेह पलंगावर आढळला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात पाठविले.
राजेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, दीपालीच्या मृत्युबद्दल शंका आहे. तिच्या गळ्याला व्रण आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उत्तरीय तपासणी अहवालानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.