बीड : अवघे वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या लोकांनी छळ केला. पैसे देऊनही नंतर दुचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला डास मारण्याचे ‘लिक्विड’ पाजल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रांती नितीन मुंडे (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे. बीडच्या क्रांतीचे लग्न मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील पवारवाडी येथील नितीन अभिमन्यू मुंडे याच्यासोबत झाले होते. सुरुवातीचे तीन महिने चांगले गेल्यानंतर नितीनने गाडी घेण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये आणण्यासाठी क्रांतीकडे तगादा लावला. त्यावेळी क्रांतीच्या वडिलांनी भूखंड विकून तिला चार लाख रुपये दिले. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने नितीन आणि क्रांती पुण्याला गेले. तिथे पैसे कमी पडू लागल्याने नितीनने पुन्हा एक लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करत क्रांतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. त्यामुळे क्रांतीच्या वडिलांनी पुन्हा ५० हजार रुपये दिले. त्यानंतर नितीनच्या मेहुण्यासाठी गाडी घेण्याकरिता ५० हजार रुपये आण म्हणून क्रांतीचा सासरी पुन्हा छळ सुरु झाला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येऊ लागले.
सततच्या छळास कंटाळून क्रांतीला तिचे आई-वडील डिसेंबर महिन्यात माहेरी बीडला घेऊन आले. काल बुधवारी क्रांतीचा पती, सासरा, दीर हे बीडला क्रांतीच्या माहेरी आले. यावेळी नितीनने बोलण्याच्या बहाण्याने क्रांतीला एका खोली नेऊन तिला डास मारण्याचे ‘लिक्विड’ बळजबरीने पाजले आणि सर्वजण पळून गेले असे क्रांतीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. अत्यवस्थ अवस्थेतील क्रांतीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रांतीच्या जबाबावरून तिचा पती नितीन मुंडे, सासरा अभिमन्यू, दीर सचिन, नणंद कल्पना दत्तात्रय बांगर, नणंदेचा पती दत्तात्रय बांगर आणि सासऱ्याचा भाऊ दशरथ बांगर या सहा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.