बीड : साडी, ब्लाऊज, लांब केस, ओठाला लाली असा हुबेहूब खऱ्याखुऱ्या तृतीयपंथीयासारखा पेहराव करून भुरटे लोक लूटमार करीत असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुणांना टार्गेट करीत अंगाला झोंबणे, खिशातून पैसे काढणे, हातातील पैसे हिसकावण्याचे प्रकार हे लोक करीत आहेत. बीड शहरासह जिल्ह्यात त्यांनी धुमाकूळ घातला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात जवळपास २०० तृतीयपंथी आहेत. ते आपल्यातीलच एकाला गुरू मानतात. गुरूच्या आदेशाला खूप महत्व असते. गुरूने शपथ दिल्याप्रमाणे ते कोणाकडेही जबरदस्तीने भिक्षा मागत नाहीत. स्वखुशीने जे देतील तेच घेत असतात. परंतु मागील काही महिन्यांपासून या तृतीयपंथीसारखा पेहराव करून भुरटे लोक लूटमार करू लागले आहेत. बीड शहरातील बसस्थानक, सुभाष रोड, नगर रोड, जालना रोड, भाजी मंडई या गर्दीच्या भागात त्यांचा वावर जास्त असल्याचे दिसते. एखाद्या व्यक्तिच्या अचानक समोर जाऊन ते अंगाला झोंबतात. खिशात हात घालणे, एखादी व्यक्ती स्वत:हून पैसे देत असेल तरी त्याच्या हातातील सर्वच पैसे हिसकावणे, शिव्या देणे, धक्का देणे असे प्रकार हे करू लागले आहेत. याला नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
खरे तृतीयपंथी असे करतच नाहीत
जे खरोखर तृतीयपंथी आहेत, ते गुरूच्या शपथेपुढे जात नाहीत. लोक जे देतील, त्यात ते समाधानी असतात. परंतु अशा भुरट्यांमुळे खऱ्या तृतीयपंथीयांकडेही पाहण्याचा दृष्टीकोन संशयास्पद होऊ लागला आहे. त्यांनाही भिक्षा देताना लोक आखडता हात घेत आहेत.
२० ते २५ लोकांची टोळी
तृतीयपंथीयांचा पेहराव केलेले हे लोक इतर जिल्ह्यातील आहेत. जवळपास २० ते २५ लोक हे आठवड्यातून एकदा बीडला येतात. संधी साधून महिलांचे दागिने पळविणे, सामान्यांना त्रास देऊन पैसे घेण्याचे प्रकार हे करीत आहेत. एका ठिकाणी ५पेक्षा जास्त लोकांची टोळी जमावाने फिरते.
पोलिसांत तक्रार, कारवाई शून्य
हे भुरटे लोक तृतीयपंथींनाही मारहाण करतात. तसेच त्यांची प्रतिमा मलीन करतात. याबाबत तीन ते चार वेळा बीड शहर ठाण्यात खुद्द तृतीयपंथींनी तक्रार दिलेली आहे. परंतु यावर कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामळेच त्यांचे मनोबल वाढत असून त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत.
डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले
आठवड्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील तरुणाने तृतीयपंथीचा पेहराव करून महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले होते. सुदैवाने नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलीस ठाण्यात आल्यावर तो तृतीयपंथी नसल्याचे उघड झाले होते. यावरून यांच्यातीलच काही लोक भुरटे असल्याचे सिद्ध होते.
बसस्थानकामागे रात्री भीती
रात्रीच्या सुमारास बसस्थानकामागील रस्त्यावर अंधार असतो. या मार्गावरून एखादी व्यक्ती रात्री जात असेल तर त्याला हे लोक अडवून लुटण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी अद्याप त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही.
कोट
लोक देतील तेवढेच पैसे आनंदाने घेतो, जबरदस्ती करत नाही. परंतु काही महिन्यांपासून भुरटे लोक आले आहेत. २० ते २५ लोकांची टोळी आहे. आम्हालाही त्रास देतात. कालच वडवणीत आमच्याशी वाद घातला. या लोकांवर कारवाई करावी, यासाठी पोलीस ठाण्यात तीन ते चार वेळा तक्रार केली. परंतु काहीच कारवाई झाली नाही. हे भुरटे लोक आमची प्रतिमा मलीन करीत आहेत.
अशफाक बाजी, बीड