बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्यास नागरिकच जबाबदार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ४ हजार ६५० विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता तब्बल ४२९ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचा टक्का तब्बल नऊ आहे. हे सर्व लोक कोरोनाचा संसर्ग घेऊन सर्वत्र फिरत होते. आरोग्य विभागाने त्यांना निष्पन्न करून उपचार सुरू केले आहेत. विनाकारण फिरणारेच सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसत असले तरी मराठवाड्यात केवळ बीड जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. तसेच दररोज २० पेक्षा जास्त मृत्यू कोरोनासह इतर कारणांमुळे एकट्या जिल्हा रुग्णालयात होत आहेत. कोरोनाची भयानक स्थिती पाहता प्रशासनाने कडक लॉकडाऊन केले. तरीही काही लोक बाहेर फिरत असल्याचे दिसत आहे. हाच धागा पकडून आरोग्य विभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून अँटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. बीड व अंबाजोगाई शहरातील मुख्य चौकात पथकांची नियुक्ती केली. ३ मे रोजी याला प्रत्यक्षात सुरुवातही झाली. आतापर्यंत तब्बल साडेचार हजार चाचण्या केल्या असून, यात ४२९ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. अशा लोकांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसते. प्रशासनाने यांना वेळीच निष्पन्न केले नसते तर यांनी शेकडो लोकांना कोरोनाचा प्रसाद दिला असता. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पडले तरी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पथकांनी थोडे ॲक्टिव्ह व्हावे
सुरुवातीच्या काळात हिंडफिऱ्यांना सरसकट पकडून कोरोना चाचणी केली जात होती. परंतु, मागील आठवड्यापासून हे पथकेही सुस्त झाले आहेत. स्वत:हून पुढे येत ते चाचणी करत नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे या पथकांनी सुरूवातीप्रमाणे ॲक्टिव्ह होऊन चाचण्या करण्याची गरज आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी या पथकांना अचानक भेट द्यावी, अशी मागणीही होत आहे.
कोट
आतापर्यंत ४२९ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा चिंता व्यक्त करणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चाचणी करून घ्यावी. तसेच विनाकारण घराबाहेर पडून संसर्ग वाढवू नये, तसेच लागणही करून घेऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
---
३ ते १९ मे दरम्यान तपासणी
एकूण ॲंटिजन चाचणी ४६५०
एकूण निगेटिव्ह ४२२१
एकूण पॉझिटिव्ह ४२९