सोमनाथ खताळ
बीड : कोरोना चाचणी केल्यानंतर एकाच व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिलेल्या अहवालाचा सॅम्पल आयडीही सारखाच आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी बीडमध्ये उघडकीस आला आहे. यानिमित्ताने प्रशासन व आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बीड शहरातील एका ३३ वर्षिय व्यक्तिने १२ एप्रिल रोजी आरटीपीसीआर स्वॅब दिला होता. त्याचा अहवाल १४ एप्रिल रोजी आला. १५ एप्रिल रोजी संबंधित रुग्णाने आपल्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातून अहवाल घेण्यास सांगितले. यावर एका नातेवाईकाला 'निगेटिव्ह' तर दुसऱ्याला 'पॉझिटिव्ह' अहवाल देण्यात आला. यावर रुग्णासह नातेवाईकही आश्चर्यचकित झाले. आता यातील खरा अहवाल कोणता? यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क केला, परंतु कोणीच प्रतिसाद दिला नाही. अखेर एका सुजान तरूणाने हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना सांगितला. त्यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना तपासणी करण्यास सांगितले. एक तास सर्व प्रशासन कामाला लागले. अखेर त्याचा अहवाल 'पॉझिटिव्ह' असल्याचे अंतीम करण्यात आले. यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
एक चूक, रुग्णांचा घेईल जीव
आरोग्य विभागातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून झालेली चूक इकडे एखाद्या सामान्य रुग्णांचा जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोराेनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, हे समजताच वृद्धांसह तरूणही अर्धे घायाळ होतात. अनेकांना रक्तदाब, मधुमेह आदी आजार असतात. अशातच ही धक्कादायक बातमी समजल्यावर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
अहवाल घेण्यासाठी तासनतास प्रतीक्षा
कोरोना चाचणी केल्यावर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो, त्यांना खाटांसाठी प्रतीक्षा करावी लागते तर दुसऱ्या बाजूला ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे त्यांना मदत केंद्राबाहेर तासनतास उभा राहून प्रतीक्षा करावी लागते. वाढती गर्दी पाहून येथे टेबल वाढविण्याची अनेकदा मागणी केली, परंतु समस्या आजही कायम असल्याचे दिसते.
रुग्ण ७ दिवसांपासून आयसोलेट
संबंधित रुग्णाने ७ एप्रिल रोजीही चाचणी केली होती. यात अहवाल निगेटिव्ह होता. परंतु, त्रास असल्याने तो घरातच डॉक्टरांच्या निगराणीत उपचार घेत होता. त्रास कमी न झाल्याने आणि डॉक्टरांच्या सल्यावरून त्याने पुन्हा १२ एप्रिल रोजी चाचणी केली होती. यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आपला गलथानपणा दाखवित दोन वेगवेगळे अहवाल दिले. परंतु, रुग्ण समजदार असल्याने सात दिवसांपासून होम आयसोलेट होता.
अहवालाची खात्री केलेली आहे. संबंधितांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे. हा अहवाल जिल्हा रुग्णालयातून दिलेला आहे.
डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
कोट
काही तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झालेली आहे. परंतु संबंधितांचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. आता यापुढे अंतीम यादी आल्याशिवाय अहवाल देऊ नये, असे मदत केंद्रात सांगितले आहे. तसेच चुका होणार नाहीत, याची काळजी घेऊ.
डॉ.कुलदीप शहाणे, प्रमुख मदत केंद्र, जिल्हा रुग्णालय बीड.
===Photopath===
150421\15_2_bed_17_15042021_14.jpeg~150421\15_2_bed_16_15042021_14.jpeg
===Caption===
सॅम्पल आयडी १३९७७७ असलेल्या त्याच व्यक्तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह देण्यात आलेला आहे.~सॅम्पल आयडी १३९७७७ असलेल्या व्यक्तिचा अहवाल कोरोना निगेटिव्ह देण्यात आलेला आहे.