बीड : ज्या ठिकाणी उपचारासाठी लोक जातात, तेच जिल्हा रुग्णालय सध्या मृत्यूचा सापळा बनले आहे. प्रत्येक सव्वा तासाला एक कोरोनाबाधित व संशयित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मागील १६ दिवसांत ३२५ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. असे असतानाही उपाययोजना आणि उपचारात सुधारणा केल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या काही प्रमाणात घटल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, मृत्यू रोखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हा रुग्णालय आणि स्वाराती रुग्णालयात संशयित व कोरोनाबाधित रुग्णांची दाखल होण्याची संख्या जास्त आहे. त्यात बीड जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला असता २ मे पासून १७ मे पर्यंत तब्बल ३२५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा आकडा चिंता व्यक्त करणारा असून आराेग्य विभागाच्या उपचार आणि सुविधांवर प्रश्न निर्माण करणारा आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आरोग्य विभागाकडून सुधारणा केल्या जात नसल्याचे आरोप होत आहेत. दररोज तक्रारी आणि आरडाओरड सुरूच आहे. अधिकारी मात्र यावर तोडगा काढून तक्रारी कमी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मशानातील सरणही विझेना
जिल्हा रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर संत भगवानबाबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मागील महिन्यापासून दिवसरात्र स्मशानात सरण रचलेले असते. आलेल्या मृतदेहांवर तत्काळ अंत्यसंस्कार केले जातात. मागील महिन्यापासून स्मशानातील सरण विझलेच नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात ॲडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. उपचारात कोठेही हलगर्जी होत नाही.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
अशी आहे जिल्हा रुग्णालयातील मृत्यूची आकडेवारी
२ मे - २३
३ मे - १०
४ मे - १५
५मे - १९
६ मे -२४
७ मे - १७
८ मे - २६
९ मे - २५
१० मे - १६
११ मे - ३२
१२ मे - २२
१३ मे - १४
१४ मे - २०
१५मे - २३
१६ मे - २४
१७ मे - १५
एकूण - ३२५