बीड : लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील व्यक्ती गर्दी करू लागले आहेत. ही गर्दी होऊ नये, याचे नियोजन करण्याऐवजी आणि आल्यानंतर समजावण्याऐवजी थेट मारहाण केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील येळंबघाट येथे बुधवारी दुपारी घडला. नेकनूर पोलिसांच्या मनमानी कारभाराने ज्येष्ठांमध्ये संताप व्यक्त होत असून, मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात सध्या लसचा प्रचंड तुटवडा आहे. ज्या केंद्रावर लस आहे तेथे ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे. बुधवारी तर केवळ ३० हजार डोस होते. त्यामुळे केवळ सात केंद्रांवर लसीकरण झाले. यातच बीड तालुक्यातील येळंबघाट येथील आरोग्य केंद्राचा समावेश होता. त्यामुळे या केंद्रावर लस घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. येथे गर्दी होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग अथवा पोलिसांनी नियोजन करणे अपेक्षित होते; परंतु असे झाले नाही. लाभार्थ्यांची गर्दी पाहून पोलीस आले आणि कसलीही समज न देता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यात ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण झाली आहे. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेकनूर पोलिसांच्या दादागिरीमुळे सामान्यांसह ज्येष्ठ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येळंबघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज राठोड यांना आठ वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला; मात्र त्यांनी फोन घेतला नाही. तर नेकनूरचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाजू घेण्यात आली.
एसपी ऑफिसमध्ये सन्मानाची चमकोगिरी
पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाइन तयार करण्यात आलेली आहे, तसेच ज्येष्ठांचा सन्मान केला जात असल्याचे वारंवार पोलीस विभागाकडून सांगण्यात येते; परंतु येळंबघाटमध्ये चक्क पोलिसांनीच ज्येष्ठांना मारहाण केली आहे. त्यामुळे त्यांनी आता समस्या मांडायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. अधीक्षक कार्यालयाकडून सन्मान केल्याची चमकोगिरी केली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
...
प्रकरण काय आहे नेमके समजून घेतो. याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
-आर.राजा, पोलीस अधीक्षक, बीड.
...
लसीकरण उद्या असेल तर आजच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पोलिसांना कल्पना दिली जाते. येळंबघाट आरोग्य केंद्रावर काय प्रकार घडला, याची माहिती घेतो.
-डॉ.नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी, बीड.
===Photopath===
290421\29_2_bed_9_29042021_14.jpeg
===Caption===
येळंबघाट आरोग्य केंद्रात बुधवारी दुपारी लसीकरणासाठी ज्येष्ठांच्या लागलेली रांग. हीच राग तोडण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली.