बीड : प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका गर्भवती महिलेवर गावातीलच एका तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आपली बदनामी होईल, या भीतीने महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये पीडित महिला ७६ टक्के भाजली असून सध्या जिल्हा रूग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील सिरस पारगाव हे पीडितेचे माहेर आहे. ८ जानेवारी २०१७ रोजी पीडितेचे लग्न अ.नगर जिल्ह्यातील एका तरूणासोबत झाले. त्याच्यापासून ती गर्भवती राहिली. सध्या पीडिता ही सात महिन्यांची गर्भवती असून प्रसुतीसाठी ती काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. ४ मे रोजी रात्री पीडितेची आई ही कार्यक्रमासाठी उमरद येथे गेली होती. त्यामुळे पीडिता ही घरात लाईट बंद करून झोपली. हीच संधी साधून गावातीलच विष्णू तुकाराम नवले हा घरात शिरला व गर्भवती महिलेवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार पीडितेला सहन झाला नाही. आपली बदनामी होईल, या भीतीने तिने ६ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.
हा प्रकार बाजूच्या महिलांनी पाहिल्यानंतर पाणी टाकून तिला विझविण्यात आले. तात्काळ पीडितेला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडिता ही ७६ टक्के भाजली असून सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पीडितेच्या जबाबावरून विष्णू नवले याच्यावर अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत.
आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्यागुन्हा दाखल होताच उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तयार करून आरोपीच्या अटकेसाठी रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, भागवत शेलार, रमेश दुबाले, खय्युम खान यांनी विष्णूच्या शिरूर तालुक्यातील औरंगपुर परिसरात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या.