कडा (जि.बीड) : ग्रामीण आरोग्य सेवा काही केल्या सुधारत नसल्याचे समोर आले आहे. आष्टी तालुक्यातील कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात बेशुद्धावस्थेत एका वयोवृद्धाला नेले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईसीजी करून आणा, असे म्हणत त्यांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला. त्यानंतर परत आल्यावर आरोग्य केंद्रात न घेताच त्यांना वाहनामध्येच तपासून मयत घोषित केले. या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.
कडा आरोग्यांतर्गत असलेल्या एका वृद्धाला सोमवारी अचानक घरी चक्कर आली. ते बेशुद्ध पडले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल आरबे हे कर्तव्यावर होते. रुग्ण आरोग्य केंद्रात न घेताच त्याला ईसीजी करून आणा असे म्हणत खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. यामध्ये जास्त वेळ गेला. पुन्हा त्यांना परत आरोग्य केंद्रात आणले. डॉ.आरबे यांनी त्यांना आरोग्य केंद्रात न घेताच आणलेल्या वाहनातच तपासून मयत घोषित केले. या प्रकारामुळे नातेवाईक संतापले होते.दरम्यान, सुविधा नसेल प्रथमोपचार करून तात्काळ पुढील आरोग्य संस्थेत पाठविणे आवश्यक होते. मात्र, आलेल्या रुग्णाची तपासणी न करताच त्याला खाजगी रुग्णालयात पाठविणे चुक असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांवर उपचार करण्यास हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिपक गरूड यांनी केली आहे.
डीएचओ, टिचओंच्या दुर्लक्षाचा परिणामप्राथमिक आरोग्य केंद्रात राहून प्रामाणिकपणे सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी बोटावर मोजण्याइतकेच आहे. आलेल्या रुग्णांवरही व्यवस्थित उपचार न करता रुग्णाला खाजगी रुग्णालयाची वाट दाखविणे संतापजनक आहे. असे प्रकार केवळ जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच घडत असल्याचा आरोप होत आहे.
तपासणी न करताच खाजगी रुग्णालयात रुग्णाला पाठविणे चुक आहे. १०० टक्के खात्री पटावी म्हणून ईसीजी करण्यास पाठविले असेल. माहिती घेऊन सांगतो. यापुढे असे प्रकार होणार नाहीत.- डॉ.संतोष कोठूळे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी
आम्हीही मयत घोषित करू शकतो, परंतु रुग्ण कधी कधी कोमात असतो. आमच्याकडे ईसीजी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरून करून आणण्यासाठी सांगितले होते.- डॉ.अनिल आरबे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कडा