बीड : अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape On Minor Girl)झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. पीडित मुलीला गुरुवारी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी बीडच्या बालकल्याण समितीपुढे हजर केले असता तिने सहा महिन्यांत चारशेहून अधिक जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. अब्रू लुटण्यात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अंमलदारांचाही समावेश असल्याचा दावा तिने केला.
पीडिता जेमतेम ९ वर्षांची असताना आईचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या तेराव्या वर्षी तिचा विवाह लावून देण्यात आला. मात्र, पतीकडून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने माहेर गाठले. एके दिवशी पित्यानेही तिच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने अंबाजोगाई गाठले. कफल्लक अवस्थेत वणवण भटकणाऱ्या या १६ वर्षांच्या मुलीवर सहा महिन्यांत सुमारे चारशेपेक्षा अधिक जणांनी अत्याचार केले. यावेळी कोणी बसस्थानकावर भीक मागत असताना जेवण देण्याच्या आमिषाने तर कोणी आश्रय देण्याच्या बहाण्याने विविध लॉज, हॉटेलवर नेऊन अत्याचार केल्याचा दावा तिने केला. त्यामुळे समिती सदस्यही चक्रावून गेले. तिला बीडमधील एका बालगृहात ठेवण्याचे आदेश समितीने दिले.
पुनर्वसनाचा प्रयत्नबालकल्याण समितीसमोर पीडित १६ वर्षीय मुलीने केलेले खुलासे धक्कादायक आणि गंभीर आहेत. तिच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ती दोन महिन्यांची गरोदर आहे. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गर्भपात करण्यात येणार आहे, अशी माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी दिली. पीडित मुलीला सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी धीर दिला.