बीड : ॲम्बुलन्समधून होणारी दारूची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघड केली. बुधवारी 20 मे रोजी सायंकाळी नगर रोडवर ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथक नगर रोडवर गस्त घालत असताना त्यांना एका ॲम्बुलन्स मधून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्याआधारे पिंपळगव्हाण शिवारातील म्हसोबा फाट्याजवळ पाळत ठेवण्यात आली. यावेळी अहमदनगरच्या दिशेकडून येणाऱ्या एका व्हॅनवर ठळक अक्षरात ॲम्बुलन्स लिहिले होते. सदर वाहनास थांबवून त्याची झडती घेतली असता त्यातून विदेशी दारूच्या 96 बाटल्या दोन खोक्यांमध्ये ठेवलेल्या आढळून आल्या. यानंतर वाहन चालक विशाल गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत 14 हजार 400 रुपयाच्या विदेशी दारू सह व्हॅन असा एकूण एक लाख 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, जवान अमिन सय्यद, सचिन सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.