कडा : आष्टी शहरातील जैन मंदिरातील ४२७ वर्षांपूर्वीच्या सहा मूर्ती चोरट्यांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आहे. असे असतानाही मध्यवस्तीत असलेल्या जैन मंदिरात चोरट्यांनी बुधवारी पहाटे प्रवेश केला. यानंतर साडेचारशे वर्षांपूर्वीच्या सहा पितळी मूर्ती लंपास केल्या. धरवेद्र उपाध्ये पंडित हे सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान मंदिरात साफसफाई करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मंदिराच्या गेटचे कुलुप तुटलेले दिसले. आत प्रवेश केला असता पंडित यांना सहा मुर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी सुभाष बोदाडे ( रा. आष्टी ) यांच्या फिर्यादीवरून बुधवारी दुपारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.