माजलगाव : तालुक्यातील माली पारगाव येथे कौटुंबिक वादातून आईवर विळ्याने हल्ला करून मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार १ सप्टेंबर रोजी घडला हाेता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेला धक्कादायक कलाटणी मिळाली. मुलाची आत्महत्या नसून, हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आईवर विळ्याने हल्ला केल्याने चिडलेल्या धाकट्या भावाने मोठ्या भावास गळा आवळून संपविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने तालुका सुन्न झाला.
माली पारगाव येथे १ सप्टेंबर रोजी कौटुंबिक वादातून पारूबाई कदम (५०) यांच्या मानेवर मोठा मुलगा बापू ऊर्फ बालासाहेब मच्छिंद्र कदम (३०) याने दारूच्या तर्रर्र नशेत वार केला होता. यात पारूबाई गंभीर जखमी झाल्या. यावेळी लहान मुलगा गणेश मच्छिंद्र कदम (२७) हाही दारू पिलेल्या अवस्थेत तेथेच होता. आईला मारून गंभीर जखमी केल्याने गणेशचा रागाचा पारा चढला व त्याने लागलीच बापूचा पाठीमागून गळा दाबला. यात बापूचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमी पारूबाई यांना
उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. बापू कदम याने आत्महत्या केल्याचा बनाव गणेशने केला.
बापू याच्या गळ्याचे व्रण हे दोरीचे नसल्याची बाब पाेलिसांच्या नजरेतून सुटली नाही. गावात चौकशी केली तेव्हा वेगळीच कुजबुज ऐकावयास मिळाली. त्यामुळे ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक नीलेश इधाटे, जमादार विठ्ठल राठोड यांनी पंचनामा करून बापू कदमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू गळफासाने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय गणेशला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी वडील मच्छिंद्र कदम यांच्या तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात मुलगा गणेश कदम विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आई पारूबाई यांची जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
....
कोठडीत रवानगी
आरोपी गणेश कदम यास २ सप्टेंबर रोजी माजलगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.