बीड : तालुक्यातील डोंगरकिन्ही बसस्थानक शेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या वादातून चारचाकीमधून आलेल्या २० ते २५ जणांनी गोंधळ घालत गोळीबार केल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
डोंगरकिन्ही बस स्थानकाजवळ येवले यांचा प्लॉट आहे. या मोकळ्या जागेसंदर्भात येवले आडनाव असलेल्या दोघांमध्ये वाद सुरु आहे. यातून बुधवारी सायंकाळी बसस्थानक परिसरातील मोकळ्या प्लॉटवर कारमधून सिनेस्टाईलने आलेल्या २० ते २५ जणांनी गोंधळ घालत गोळीबार केल्याची घटना घडली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अंमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाहणी केली असता हवेत गोळीबार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. घटनास्थळावरून काडतूस देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. घटनास्थळी ठाणेप्रमुख शामकुमार डोंगरे यांनी देखील धाव घेत पाहणी केली. संशयितांची चौकशी सुरु असून, त्याद्वारे इतर आरोपींचा शोध सुरु असून, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती उपाधीक्षक विजय लगारे यांनी दिली.
सीसीटीव्हीद्वारे तपास सुरु
बसस्थानक परिसरात असलेले दुकान व हॉटेलसमोर असलेले सीसीटीव्हीच्या आधारावर गोळीबार करणाऱ्या जमावातील लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.