गेवराई : तालुक्यात कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने लाॅकडाऊन लावण्यात आला आहे, मात्र यातही शहरातील काही दुकानदार शटर उघडून दुकानात ग्राहकांना प्रवेश देतात व बाहेरून कुलूप लावुन व्यवहार, व्यवसाय करत आहेत, तर विनाकारण फिरणाऱ्यांना दररोज प्रशासनाच्या वतीने दंड आकारूनही रस्त्यावर नागरिकांची गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रोगाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊन लावला आहे, परंतु लाॅकडाऊन असतानाही शहरातील अनेक दुकानदार दुकानाचे शटर उघडून दुकानात ग्राहक घेऊन व नंतर बाहेरून कुलूप लावून एक जण दुकानाबाहेर राखण बसत आहे. दुकानदार मोठ्या प्रमाणात ग्राहकांना प्रवेश देऊन धंदा करत आहेत. यावर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक दुकानांवर कारवाई करून सील लावूनदेखील हे प्रकार कमी होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. कोल्हेर रोड, शास्त्री चौक, नवीन बसस्थानक, मोढा नाका, मोमीनपुरा, इस्लामपुरासह विविध भागात दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे शहरात लाॅकडाऊन आहे काय नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शहरात दिवसभर गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दुकानदार व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
( कोट )
आम्ही दररोज दुकानदारावर कारवाई करत आहोत, मात्र तरीही काही दुकानदार शटर उघडून आत बसून व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले.
===Photopath===
220521\20210522_110941_14.jpg