परळी (बीड ) : येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण 750 मेगावॉट क्षमतेच्या तीन संचा पैकी एक संच बंद असून दोनच संच चालू आहेत. या दोन संचातुन आज दुपारी 12 च्या सुमारास 397 मेगावॉट वीज निर्मिती केली. मागील ९ दिवसांपासून 250 मेगावॉटचा कोळस्याच्या कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे केंद्राची वीज निर्मिती क्षमता अर्ध्यावर आली आहे.
खडका धरणात एक महिना पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या महिन्यात 250 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 6 कोळसा कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संच क्र. 8 हा सुद्धा बंद आहे. सध्या क्रमांक 6 व 7 हे दोनच संच चालू आहेत. धक्कादायक म्हणजे केंद्रात एक दिवस पुरेल एवढाच कोळसा पुरवठा होत आहे अशी माहिती मुख्यभियंता प्रकाश खांडारे यांनी दिली.
सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारातून वीज निर्मिती साठी पाणी पुरवठा होतो. मात्र या धरणात एक महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. खडका धरणात माजलगाव व पैठण येथील धरणातून पाणी पुरवठा भविष्यात होऊ शकतो असे सांगण्यात येते. दरम्यान, परळी शहरात कालपासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. काल दुपारी 3 वाजेला खंडित झालेला वीज पुरवठा संध्याकाळी 7 वाजता पूर्ववत झाला. आजही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.