अपघात वाढले
वडवणी : बीड परळी हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर जड वाहने, तसेच छोटे वाहने भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यातच मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करताना रिक्षा, मोटारसायकल यांचे दिवसेंदिवस अपघात होताना दिसत आहेत.
तंटामुक्त गाव अभियान नावालाच
वडवणी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावात राजकीय गटबाजीमुळे व अकार्यक्षम पदाधिकारी यांच्या मुळे ग्रहण लागले असल्याने, या अभियानाचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे.
उन्हाळ्याची चाहूल माठ विक्री सुरू
वडवणी : या वर्षी पाहिजे तशी थंडी पडली नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळा जाणवायला लागला. यामुळे माठ, सुरई, रांजण विक्री होत असून, खरेदीकरिता नागरिक येत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच, बाजारात माठ विक्रीसाठी येतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात अखेरीस माठ विक्रीला येत होते. मात्र, तीव्र उन्हामुळे मार्च महिन्यात विक्रीला आले आहेत. शेतकरी, शेतमजूर भरउन्हात कामे करून घरी थंडगार पाणी मिळावे, यासाठी माठांची खरेदी करताना दिसत आहेत.
शेतकरी जाहीर अनुदानाच्या प्रतीक्षेत
वडवणी : भाजप-शिवसेना शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. मागील सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार सानुग्रह अनुदान जाहीर करून तशी तरतूद केली होती. महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना काढून, प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते, परंतु ती रक्कम अद्याप मिळाली नाही.