लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच औषधींचा तुटवडा जाणवत असल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मुक्काम वाढत आहे. त्यामुळे इतर लोकांना खाटा मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात तर ऑक्सिजन खाटांना मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे, तर खाटा मिळविण्यासाठी रुग्ण आणि नातेवाइकांची धडपड आहे.
कोरोनाबाधित आणि संशयितांवर उपचारात महत्त्वाचे समजले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तसेच फॅबी फ्लू गोळ्या, पाेटात दिले जाणारे लोमो इंजेक्शनचाही तुटवडा आहे. पॅरासिटामल, ॲझिथ्रोमायसिन, झिंक या गोळ्यांचा साठा असून, कमी असलेली औषधांची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.
नातेवाइकांची घालमेल
मागील आठ दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात खेटे मारत आहे. परंतु, अद्यापही आम्हाला इंजेक्शन मिळालेले नाही. तिकडे खासगी डॉक्टर रोज बिलाचे आकडे वाढवताहेत.
- पंडितराव शिंदे
अगोदरच घरची परिस्थिती बिकट आहे. सरकारीत आयसीयूमध्ये बेड मिळाला नाही म्हणून बीड शहरातीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. आज नऊ दिवस झाले तरीही सुटी झालेली नाही. स्कोअर ११ असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस पूर्ण झाल्यावर सुटी देऊ, असे डॉक्टर म्हणतात
- प्रकाश माने
माझ्या साडूची शुक्रवारी कोराेना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यांना काही त्रास नाही; पण उगाच रिस्क नको म्हणून आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो होतो; पण येथे त्यांना नको म्हणून आयटीआयमध्ये पाठविले. येथील परिस्थिती पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशन घेतले.
- मंगेश पारीख
माझ्या तरुण भावाला जिल्हा रुग्णालयात बेड मिळाला होता; पण त्याला काही त्रास नव्हता. एवढ्यात एक वृद्ध महिला आली. तिला ऑक्सिजन बेडची गरज होती. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही सीसीसीमध्ये गेलोत आणि त्या महिलेला ऑक्सिजन बेड दिला. यात खूप समाधान मिळाले.
- अंकुश काळे
मागणी केलेली आहे.
रेमडेसिविर, फॅबी फ्लू गोळी, लोमो इंजेक्शन यांचा तुटवडा आहे. याबाबत आमच्याकडून वारंवार मागणी केली जात आहे. तसेच ऑक्सिजन लिक्विडचीही मागणी केली.
- रामेश्वर डोईफोडे,
औषध निरीक्षक बीड
सकारात्मक राहावे
रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर काही औषधींचा तुटवडा आहे, हे खरे आहे. तो उपलब्ध केला जात असून, घाबरून न जाता सकारात्मक राहावे.
- डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.